मुंबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने एशिया कपमध्ये नवव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अगदी राजकीय नेत्यांपासून, अभिनेते ते उद्योगपतींपर्यंत सर्वजण या खास विजयासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे.
राष्ट्रभक्ती रक्तात होती तर मग पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी मैदानातच उतरायला नको होतं, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्र सोडलं आहे. शिवाय सध्या देशात वरपासून खालपर्यंत सगळीगडे ड्रामा सुरू आहे. देशातील लोकांसमोर नौटंकी केली जात आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भारतीय टीमवर निशाणा साधला आहे. यावेळी राऊतांनी सूर्याचा एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
संबंधित व्हिडीओत सूर्यकुमार यादव एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासोबत हात मिळवणी करताना दिसत आहे. तसेच दोघांमध्ये संवाद घडून ते हसताना देखील दिसत आहेत. हाच व्हिडीओ शेअर करत राऊतांनी टीकास्र सोडलं.
संजय राऊत नक्की काय म्हणाले?
एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले, आशिया कपच्या सुरुवातीला 15 दिवसांपूर्वी पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीसोबत हात मिळवला, फोटोही काढला. आता हे लोक देशाला नौटंकी दाखवत आहेत. एवढी राष्ट्रभक्ती रक्तात होती, तर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला मैदानातच उतरायला नको होतं. वरून खालीपर्यंत सगळीकडे फक्त ड्रामा एके ड्रामाच आहे. भारताची जनता मूर्ख नाहीये.